top of page
  • Sthapati

अजंठा - गौताळा टुरिझम कॉरिडॉर

Updated: Mar 31, 2022


मराठवाडा व खान्देश ह्यांना दोन प्रदेशात विभागणी करणाऱ्या अजंठाच्या डोंगररांगांची एकूण लांबी हि १२५ किमी असून ह्या बुलढाण्याच्या जाईचा देव ह्या ठिकाण पासून चालू होतात ते पितळ खोरा पाटणादेवीला संपतात. हा संपूर्ण परिसर गौताळा अभयारण्यासाठी राखीव आहे. ह्या डोंगररांगांमध्ये वेताळवाडीचा किल्ला, जंजाळयाचा किल्ला, अंतुरचा किल्ला, सुतोंड्याचा किल्ला, व इतर सैनिकी चौक्याची रेलचेल आहे. ह्या अजंठा --- गौताळा टुरिझम कॉरिडॉर मध्ये अजून विविध धबधबे जसे कि वडालीचा धबधबा, अजिंठ्याचा धबधबा, रुद्रेश्वरचा धबधबा, धारेश्वरचा धबधबा,पितळखोऱ्याचा धबधबा, तसेच गौताळा अभ्यारण्यामधील विविध धबधबे, वैशिष्ट्यपूर्ण कालदरी, भिलदरी, जाईचा देव, जगदंबा माता वाढोणा,अंबऋषी देवस्थान, रुद्रेश्वर मंदिर, मुर्डेश्वर मंदिर, कळसाई मंदिर, घाटनांदऱ्याजवळील इंद्रगडी,जोगेश्वरी,मनुआई मंदिर, पिनाकेश्वर मंदिर,धारेश्वर मंदिर, पाटणादेवी मंदिर इत्यादी निसर्गाच्या कुशीत उभारलेले व घाटमाथ्यावर असलेले देवस्थाने आहेत. सुंदर अश्या निसर्गरम्य ठिकाणी असल्यामुळे ह्या सर्व ठिकाणी स्थानिक पर्यटकांची व भक्तांची कायम गर्दी असते. ह्या डोंगर रांगामध्ये गणेशवाडी कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र तसेच कुंभारी कृषी पर्यटन केंद्र हि ग्रामीण भागाची आवड असलेल्या पर्यटकांना ह्या परिसराची सफर घडवतात व त्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था करतात.

ह्या डोंगर रांगामध्ये बिबटे, अस्वल, नीलगायी, कोल्हे, लांडगे, तडस, ससे, हरिणांचे विविध प्रकार, रानमांजर, ढोले (रानटी कुत्रे), उद मांजर, सिंहासारखी आयाळ असलेले माकड, काळ्या तोंडाची माकडे, जंगली डुक्कर इत्यादी वन्यप्राण्यांचे कायम दर्शन होत असते. क्वचित प्रसंगी वाघाचे पण दर्शन होते. ह्या अजंठा - गौताळा टुरिझम कॉरिडॉर मध्ये अंदाजे २५० प्रकारचे पक्षी आढळतात त्यात महत्वाचे बगळे,चमच्या,स्टोर्क,करकोचा,शराटी, कबुतर, विविध प्रकारचे बदके,मोर,तितर,पक्षपाती पक्षी,घुबड हे पक्षी बहुसंख्येने आढळतात. विविध प्रकारचे साप, अजगर, घोरपड,पाली हे सरपटणारे प्राणीही आपणास पाहावयास मिळतात. वृक्षयांमध्येसागवान,चंदन,अंजन,मोह,आवळा,बेल,बिब्बा,आंबा,जांभूळ,पळस,लिंब,सीताफळ,वड,पिंपळ इत्यादी आढळतात.

हा परिसर पर्यटकांसाठी सुवर्णसाठा असूनही दुर्लक्षित राहिलेला आहे. ह्या अजंठा - गौताळा टुरिझम कॉरिडॉर पर्यटन प्राधिकरणामुळे ह्या भागातील पर्यटन क्षेत्रातील विस्कळीत पणा दूर होऊन, स्थानिक तसेच परराज्यातील व परदेशातील पर्यटकांसाठी विविध सोई सुविधांची उपलबध्दता होणार आहे. ह्या परिसरात हेरिटेज पर्यटन , आर्किऑलॉजिकल पर्यटन ,दुर्ग पर्यटन, वनपर्यटन,कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, जलपर्यटन, निसर्ग पर्यटन, साहसी पर्यटन, धार्मिक पर्यटन, अभयारण्य पर्यटन, स्थानिक यात्रा पर्यटन, आदिवासी संगीत व नृत्य महोत्सव, अजंठा महोत्सव इत्यादी पर्यटनाशी निगडित प्रकारातून स्थानिक रोजगार निर्मिती तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धन होणार आहे.

पर्यटनामुळे विविध उद्योगांचा श्रीगणेशा होत असतो हे जागतिक सत्य असल्या मुळे विविध देश पर्यटनवाढी साठी प्रयत्न करीत असतात. अजंठा - गौताळा टुरिझम कॉरिडॉर पर्यटन प्राधिकरणामुळे ह्या परिसरात अनेक उद्योग स्थापित होतील व वाढतील व त्यातून स्थानिक रोजगारनिर्मिती होऊन स्थानिक अर्थशास्त्र हि उचल घेईल. शेतकरी आत्महत्या हा दुष्काळामुळे होणार अत्यंत वाईट परिणाम आहे, पण पर्यटनातून येणाऱ्या सुब्बतेमुळे तो कमी होण्यास मदत होईल.

सदरील प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व १२५ किमी परिसरातील विविध पर्यटनस्थळांवरतीरस्ते,पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, निवासव्यवस्था, भोजनव्यवस्था, बगीचे, संग्रहालय, विविध वस्तू भंडारगृहे, विदयुत पुरवठा, इत्यादी बाबींची पूर्तता होईल. तसेच ह्या संपूर्ण परिसराचा अभ्यास करून त्याचे विपणन करून जास्तीत जास्त पर्यटकांना ह्या भागाकडे आकर्षित केल्या जाईल व स्थानिक रोजगार वाढीवर भर दिल्या जाईल.


आर्कीटेक्ट अनिरुद्ध नाईक,
26 views0 comments

Comments


Sthapati Planners &

Developers Pvt. Ltd.

bottom of page